असे नभ झरताना,
खिडकीपाशी बसावसं वाटतं.
टपोरे थेंब झेलताना,
पुन्हा एकदा भिजावंसं वाटतं.
असे नभ झरताना,
पुन्हा धरा भिजताना.
असे नभ झरताना,
मागे वळून, माझं मन पाहतं.
सरलेल्या दिवसांची ते,
थोडी विचारपूस करतं.
असे नभ झरताना,
पुन्हा धरा भिजताना.
असे नभ झरताना,
लागलीच तुझी आठवण येते.
दोन क्षणांच्या सोबतीची,
ओल्या डोळ्यांत साठवण होते .
असे नभ झरताना,
पुन्हा धरा भिजताना.
असे नभ झरताना,
थोडं खुळ्यागतच वाटतं.
पाऊस होऊन बेधुंद,
तुला मिठीत घ्यावसं वाटतं.
असे नभ झरताना,
पुन्हा धरा भिजताना.
असे नभ झरताना,
दोन क्षण थांबावसं वाटतं.
आलेल्या सरीसोबत पाहता पाहता,
कुठेतरी वाहून जावसं वाटतं.
असे नभ झरताना,
पुन्हा धरा भिजताना.
असे नभ झरताना,
मी अगदी चिंब भिजतो.
पुन्हा घराकडे वळताना,
मन मात्र कोरडंच राहतं.
असे नभ झरताना,
पुन्हा धरा भिजताना.
असे नभ झरताना,
"थोडसं मनातलं" माझ्या,
नकळत कागदावर उतरतं.
पावसाऐवजी मग शब्दांतच भिजणं होतं.
असे नभ झरताना,
पुन्हा धरा भिजताना.
No comments:
Post a Comment