Marathi Kavita | Prem Kavita | Virah Kavita | Aayushya Kavita | Charoli | Shayari
मराठी कविता | प्रेम कविता | विरह कविता | आयुष्य कविता | चारोळी | शायरी

माझ्या ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत आहे.
मी लिहिलेल्या कवितांचा पुरेपूर आस्वाद घ्या आणि हो, आपल्या प्रतिक्रिया / comments नक्की द्या.

Sunday, October 23, 2011

पाऊस पडून गेल्यावर...


पाऊस पडून गेल्यावर,
मी ओला चिंब भिजलेला.
पानांवरल्या थेंबांत,
मी शांत निजलेला.

पाऊस पडून गेल्यावर,
मी पुन्हा भरकटलेला.
नुकत्याच दरवळलेल्या,
मातीच्या गंधात मिसळलेला.

पाऊस पडून गेल्यावर,
मी उगाच थांबलेला.
क्षितिजांवरले थेंब,
तळहातावर झेलणारा.

पाऊस पडून गेल्यावर,
मी तिच्यात गुंतलेला.
भिजलेल्या साडीत तिला,
पाहण्यात हरवलेला.

पाऊस पडून गेल्यावर,
मी मोकळ्या आभाळाचा.
पिवळी किरणे टाकणार्‍या,
त्या मावळत्या सूर्याचा.

पाऊस पडून गेल्यावर,
मी शब्दांत भिजलेला.
पावसावर कविता करण्यास,
पुन्हा सज्ज झालेला.



Tuesday, October 4, 2011

सहजच कधी...

सहजच कधी,
एक कटाक्ष टाकून बघ.
इवलाश्या हृदयाची माझ्या,
ही साद ऐकून बघ.

सहजच कधी,
थोडसं मनातलं...बोलून बघ.
शब्दांपलीकडल्या मला,
कधी ओळखून बघ.

सहजच कधी,
जगाला विसरून बघ.
थरथरता हात तुझा,
माझ्या हाती देऊन बघ.

सहजच कधी,
शब्दांशिवाय बोलून बघ.
नसेलच जमत तुला,
तर हलकेच लाजून बघ.

सहजच कधी,
तुझं काळीज ऐकून बघ.
तुला ऐकू येणारा आवाज,
माझ्याच काळजाचा असेल बघ.




Saturday, October 1, 2011

कधीतरी...


कधीतरी आठवणींसोबत,
एकटच बसावं.
मनातल्या अंधार्‍या कोपर्‍यात,
चांदणं शोधावं.

कधीतरी मनाला आपल्या,
शांत राहायला सांगावं.
घट्ट मिटून डोळे,
त्याच्या अंतरंगात हिंडावं.

कधीतरी क्षिताजाकडे,
एक टक पाहावं.
निरोप घेणार्‍या दिनकराला,
"पुन्हा भेटू" म्हणावं.

कधीतरी हृदयातल्या भावना,
अलगद बाहेर काढाव्यात.
डोळ्यांतील आसवांसवे,
त्या ओठांवर ओघळू द्याव्यात.

कधीतरी दुसर्‍यापेक्षा,
आपल्यात चुका शोधाव्या.
दगडापुढे नमताना,
माणसात देव शोधावा.